नवी मुंबई प्रतिनिधी : नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक कामकाजाकरिता नियुक्त कर्मचा-यांच्या प्रशिक्षणास 1 जानेवारी रोजी नेरुळ विभागापासून प्रारंभ झाला असून 2 जानेवारी रोजी बेलापूर विभागातील प्रभाग क्रमांक 25,26,27,28 यामध्ये नियुक्त कर्मचा-यांचे प्रशिक्षण सत्र वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृहात पार पडले. बेलापूर विभागाच्या निवडणूक निर्णय अधिकारी श्रीम. प्रिती पाटील यांच्या नियंत्रणाखाली 25 ठिकाणांवरील 158 मतदान केंद्रांवर नेमलेल्या कर्मचा-यांना निवडणूक विषयक प्रशिक्षण देण्यात आले.

मतदान व मतमोजणी कामकाजाच्या नोडल अधिकारी उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे यांच्या माध्यमातून प्रशिक्षण विषयक सर्व बाबींची सुयोग्य व्यवस्था सहा.निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार श्री. अमित पूरी, सहा.आयुक्त तथा बेलापूर विभाग अधिकारी श्री. प्रशांत नेरकर, कार्यकारी अभियंता श्री. मदन वाघचौडे यांच्या सहयोगाने करण्यात आली होती.
यावर्षी पहिल्यांदाच बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीने निवडणूक होत असून बेलापूर विभागातील 25,26,27 या 3 प्रभागांमध्ये अ,ब,क,ड अशा 4 जागा असून प्रत्येक मतदाराला 4 मते द्यावयाची आहेत तसेच 28 व्या प्रभागात अ,ब,क अशा 3 जागा आहेत, त्यामुळे प्रत्येक मतदाराला 3 मते द्यावयाची आहेत. याबाबत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत असून आजच्या प्रशिक्षण सत्रात या पध्दती विषयी तसेच निवडणूक कामकाजाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. बेलापूर विभागाचे सहा.निवडणूक अधिकारी श्री. अमित पूरी यांनी मतदान केंद्रावर नियुक्ती झालेल्या उपस्थित केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी 1,2,3 यांना प्रशिक्षण दिले.
यावेळी बेलापूर विभागात निवडणूक विषयक कामकाजासाठी नियुक्त क्षेत्रीय अधिकारी यांच्यामार्फत सर्व कर्मचा-यांना ईव्हीएम मशीनचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले.

निवडणूक विषयक कामकाजासाठी नियुक्ती हे प्रत्येक कर्मचा-यासाठी राष्ट्रीय कर्तव्य आहे याची जाणीव ठेवून निवडणूक कामासाठी नियुक्ती आदेश मिळालेल्या प्रत्येक कर्मचा-याने प्रशिक्षणास उपस्थित राहणे अत्यावश्यक आहे. तथापि या बाबीचे गांभीर्य न बाळगता 1 जानेवारी रोजी बेलापूर विभागाच्या प्रशिक्षण वर्गास अनुपस्थित राहिलेल्या 200 हून अधिक कर्मचा-यांना लगेचच प्रशासन विभागाच्या वतीने नोटीसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती उपआयुक्त प्रशासन तथा निवडणूक विषयक कामकाजातील मनुष्यबळ विभागाचे नोडल अधिकारी श्री. किसनराव पलांडे यांनी दिली. नोटीस बजावूनही उपस्थित न राहिल्यास संबधितांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात येईल असेही प्रशासन विभागाच्या वतीने सूचित करण्यात आले आहे. 2 जानेवारी रोजीच्या प्रशिक्षणास अनुपस्थित राहिलेल्या कर्मचा-यांनाही नोटीसा बजाविण्यात येत आहेत.



