सोमवार, फेब्रुवारी 2, 2026
Google search engine
Homeआरोग्यनवी मुंबईत आरोग्यप्रेमी नागरिकांच्या उत्साही सहभागातून आंतरराष्ट्रीय योग दिन यशस्वी

नवी मुंबईत आरोग्यप्रेमी नागरिकांच्या उत्साही सहभागातून आंतरराष्ट्रीय योग दिन यशस्वी

 नवी मुंबई : ‘स्वच्छतेतून आरोग्य, आरोग्यासाठी योग’ या सूत्रावर आधारित योगविषयक विशेष कार्यक्रमाचे आयोजन आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सिडको आणि द आर्ट ऑफ लिव्हींग यांच्या सहयोगाने वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात आयोजित करण्यात आले होते. अत्यंत भव्यतम स्वरूपात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात विविध वयोगटातील 5 हजारहून नागरिकांनी सहभागी होत हा उपक्रम यशस्वी केला.

            याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री गणेश नाईक, बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम.मंदाताई म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, स्वच्छ नवी मुंबई मिशनचे युथ आयकॉन आंतराष्ट्रीय जलतरणपटू श्री.शुभम वनमाळी, प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या शिलादिदी, श्री.अनिल कौशिक, श्री.राजू शिंदे, श्रीम. रेखा चौधरी, द आर्ट ऑफ लिव्हींगचे श्री.हनुमंत शिंदे, योग प्रशिक्षक श्री.प्रमोद कोकणे व श्रीम.दिप्ती देशपांडे  तसेच महानगरपालिकेचे विभागप्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

            आजच्या धावपळीच्या जीवनात शरीराची व मनाची संपन्नता वाढविणारा योग हा आपल्या दररोजच्या जीवनशैलीचा एक भाग व्हायला हवा असे योगाचे महत्व सांगत वन मंत्री गणेश नाईक यांनी माणसाचे मन शुध्द व संतुलित करणा-या योगाचे महत्व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक योग दिनाच्या माध्यमातून जगभरात वृध्दींगत केले असे सांगितले.

            आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पंतप्रधान महोदयांच्या प्रेरणेतून मागील 11 वर्षांपासून सातत्याने योगविषयक कार्यक्रमाचे नवी मुंबईत आयोजन केले जात असल्याचा आनंद व्यक्त करीत आजच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थ्यांचा उत्साह बघता नव्या पिढीतही योग परंपरा रूजत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

            महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनीही मनाच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणारा आजचा दिवस अतिशय आनंदाचा असल्याचे मत व्यक्त करीत आजच्या कार्यक्रमापासून प्रेरणा घेऊन नागरिक आपल्या दररोजच्या नित्यक्रमात योगाचा समावेश करतील व शहराच्या स्वच्छतेप्रमाणेच मनाच्या स्वच्छतेत व मन:शांतीत पुढाकार घेतील असा विश्वास व्यक्त केला.

            विशेष म्हणजे यावेळी उपस्थित मान्यवरांनी नागरिकांसह योगक्रियेत प्रत्यक्ष सहभाग घेतला. द ऑर्ट ऑफ लिव्हींगच्या प्रशिक्षकांनी अगदी सहजसोप्या पध्दतीने योगक्रिया करून घेतल्या तसेच प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्व विद्यालयाच्या शिलादिदी यांनी मन:शांतीची प्रात्यक्षिके करून घेतली.

            विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालयाची वस्त्र समिती आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त सहयोगाने राबविल्या जाणा-या वस्त्र पुनर्निर्माण सुविधा केंद्राव्दारे टाकाऊ कपड्यापासून पुनर्निर्मिती केलेल्या विशेष योगा मॅटवर मंत्रीमहोदयांसह आयुक्त व इतर मान्यवरांनी योगासने केली.

            यावेळी योगविद्येचे लाभ लिहिलेले वस्त्र तुकडे जोडलेली पुनर्निर्मित गोधडी प्रदर्शित करण्यात आली होती. याप्रसंगी नागरिकांच्या माहितीसाठी मांडलेल्या वस्त्र पुनर्निर्माण सुविधेच्या जनजागृतीपर स्टॉललाही मान्यवरांनी भेट देत या उपक्रमाची प्रशंसा केली व या उपक्रमात सर्व नवी मुंबईकर नागरिकांनी योगदान द्यावे असे आवाहन केले.

            1 जुलै पासून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘स्वच्छता अपनाओ, बिमारी भगाओ’ या अभियानास प्रारंभ होत असून आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या अभियानाच्या पूर्वतयारीस सुरूवात झाली असून या अंतर्गत संपन्न होणा-या स्वच्छता विषयक उपक्रमांतही उत्साहाने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

            कार्यक्रमाचे आयोजक म्हणून क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपआयुक्त श्रीम.अभिलाषा म्हात्रे – पाटील, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे व श्रीम.स्मिता काळे यांनी उपस्थित मान्यवरांचे वृक्षरोपांच्या कुंड्या देऊन पर्यावरणस्नेही  स्वागत केले.

            यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन  ‘एक पृथ्वी, एक आरोग्य, यासाठी योग’ (Yoga for One Earth, One Health) या संकल्पनेवर आधारित साजरा करण्यात येत असल्याने स्वच्छ शहर असा नावलौकिक असणा-या नवी मुंबईने स्वच्छता, आरोग्य आणि योग या त्रिसूत्रीचे महत्व अधोरेखित करीत आरोग्यप्रेमी नागरिकांनी एकत्र येत अत्यंत उत्साहाने आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments