संविधान परिचय कार्यशाळेतून महापालिका कर्मचा-यांनी जाणून घेतली संविधानाची मूल्ये

0
7

नवी मुंबई, दि. 5 जून : अमृतमहोत्सवी संविधान पर्वाच्या अनुषंगाने भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात संविधान अमृत महोत्सव साजरा होत असून त्या अंतर्गत ‘घरोघरी संविधान अभियान’ राबविण्यात येत आहे.

या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर संविधान साक्षर होण्याच्या अनुषंगाने वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रथम टप्प्यात नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी यांच्याकरिता संविधान परिचय कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. अशा कार्यशाळा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ऐरोली आणि न.मुं.म.पा मुख्यालय येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. तसेच 22 मे 2025 रोजी कै. अण्णासाहेब पाटील स्मृतीभवन, कोपरखैरणे येथे परिमंडळ 2 व कोपरखैरणे विभाग कार्यालय येथील अधिकारी, कर्मचारी यांचेकरीता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

त्याचप्रमाणे दि.29 मे रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ऐरोली येथे समाजविकास विभागातील सर्व समाजसेवक व समुहसंघटक तसेच घणसोली, ऐरोली, दिघा विभागामधील अधिकारी-कर्मचारी यांचेकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेप्रसंगी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या विभागप्रमुख उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे, ऐरोली विभागाचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी सुनील काठोळे, स्मारकाच्या सल्लागार संध्या अंबादे आणि 98 अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये भारतीय संविधानाचे अभ्यासक लेखक सुरेश सांवत आणि मुंबई विद्यापीठाचे प्रा.मृदुल निळे यांनी संविधानातील मूल्य व अधिकार या विषयी सांगोपांग माहिती देत संविधानाचे महत्व विशद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here