गुरूवार, जानेवारी 29, 2026
Google search engine
Homeसामाजिकमतदान साहित्य वितरण व्यवस्थेची आयुक्त डॉ. कैलास‍ शिंदे यांच्याकडून पूर्वपाहणी

मतदान साहित्य वितरण व्यवस्थेची आयुक्त डॉ. कैलास‍ शिंदे यांच्याकडून पूर्वपाहणी

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असून बुधवार दि. 14 जानेवारी 2026 रोजी आठही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातून मतदान साहित्य वितरण करुन मतदान केंद्रावर नियुक्त मतदान अधिकारी पथके आपापल्या केंद्रांकडे रवाना होणार आहेत. याबाबतच्या साहित्य वितरण व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाला भेट देउुन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड उपस्थित होते.

            याप्रसंगी आयुक्तांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील ईव्हीएम मशीन स्ट्राँग रुम सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.  त्याठिकाणाहून मतदान यंत्रे व मतदान साहित्य हे मतदान केंद्रनिहाय वितरणाच्या पध्दतीची माहिती घेत अत्यंत शांततेने व सुव्यवस्थीत रितीने मतदान साहित्य वितरण होईल याची खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

            यामध्ये वितरण व्यवस्थेच्या ठिकाणी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांची हजेरी घेणे, त्यांचे मतदान केंद्रनिहाय समूह एकत्रित करणे, त्यांना क्रमवार साहित्य वितरण करणे, त्याच्या व्यवस्थित नोंदी घेणे, संबधित क्षेत्रिय अधिका-यांसमवेत ते व्यवस्थितपणे आपापल्या मतदान केंद्रांवर पोहचतील याची काळजी घेणे, त्यासाठी आवश्यक वाहतूक व्यवस्था करणे व सुरक्षा व्यवस्था ठेवणे, त्याचप्रमाणे त्यांच्या अल्पोपहाराची व्यवस्था करणे अशा सर्व बाबींचे व्यवस्थित नियोजन होईल याकडे बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी मोठया संख्येने मतदान केंद्रे आहेत अशा काही ठिकाणांवरील व्यवस्थेचीही आयुक्तांनी पाहणी करुन काही सुधारणा सूचित केल्या.

            नवी मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने सुरुवातीपासूनच प्रत्येक टप्प्यातील कार्यवाही सुव्यवस्थित रितीने पार पाडण्याकडे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे बारकाईने लक्ष असून 13 जानेवारी रोजी सायं.5.30 वाजता निवडणूकीचा प्रचार कालावधी संपल्यानंतर आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही याकडेही काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश संबधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments