नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 – 26 करीता दि. 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायं. 5.30 या वेळेत मतदान होत असून राज्य निवडणूक आयोगामार्फत सूचित करण्यात आल्याप्रमाणे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गेल्यानंतर आपली ओळख पटविण्यासाठी मतदाराने आपला फोटो असलेले ‘मतदार ओळखपत्र’ (EPIC – Electors Photo Identity Card) सादर करावे असे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सूचित केले आहे. जे मतदार छायाचित्रासह असलेले आपले मतदार ओळखपत्र सादर करु शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त खालील 12 पुराव्यांपैकी कोणताही पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
या 12 पुराव्यांमध्ये – (1) भारताचा पासपोर्ट,
(2) आधार ओळखपत्र – आधार कार्ड,
(3) वाहन चालविण्याचा परवाना,
(4) आयकर विभागाकडील पॅन ओळखपत्र – पॅन कार्ड,
(5) केंद्र शासन / राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम / स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या
कर्मचा-यांना फोटोसहित दिलेली ओळखपत्रे,
(6) राष्ट्रीयकृत बँका अथवा पोस्ट ऑफिस यामधील खातेदाराचे फोटो असणारे पासबुक,
(7) सक्षम प्राधिका-याने दिलेला फोटोसहित अपंगत्वाचा दाखला,
(8) राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील, फोटो असलेले ओळखपत्र MNREGA जॉब कार्ड),
(9) निवृत्त कर्मचा-यांची अथवा त्यांच्या विधवा / अवलंबित व्यक्ती यांचा फोटो असलेली निवृत्ती वेतन
विषयक कागदपत्रे (उदा. पासबुक, प्रमाणपत्र इ.),
(10) लोकसभा / राज्यसभा सचिवालय तसेच विधानसभा / विधानपरिषद सचिवालय यांनी आपल्या
सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र,
(11) स्वातंत्र्य सैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र,
(12) केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटोसहित कार्ड
– अशा 12 पुराव्यांचा समावेश आहे.
असे असले तरी मतदाराने प्राधान्याने आपले फोटो असलेले निवडणूक ओळखपत्र सादर करावे असे सूचित करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे मतदान करताना तोतयागिरी करणा-याविरुध्द राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल याचीही नोंद घेण्यात यावी.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा याकरीता विविध आस्थापना/ उद्योग / दुकाने व व्यावसायिक यांनी आपल्या आस्थापनांवर कार्यरत असलेल्या कामगारांना दि. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान करण्यासाठी सुट्टी द्यावी असे शासन आदेशानुसार सूचित करण्यात येत आहे.
तरी सर्व मतदारांनी नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीमध्ये दि. 15 जानेवारी 2026 रोजी, सकाळी 7.30 ते सायं. 5.30 या वेळेत आपल्याला राज्यघटनेने बहाल केलेला मतदानाचा हक्क बजावावा व शहराच्या प्रगतीत आपले योगदान द्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.




