*मालमत्ता कर सुधारणा व डिजिटल प्रशासनाचा देशपातळीवर गौरव*
नवी मुंबई : मालमत्ता कर व्यवस्थेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने राबविलेल्या व्यापक सुधारणा व नागरिक-केंद्रित डिजिटल प्रशासन उपक्रमासाठी देशातील प्रतिष्ठेचा ‘स्कॉच पुरस्कार २०२५’ नवी दिल्ली येथे १०४ व्या स्कॉच शिखर परिषदेत आज महानगरपालिकेला प्रदान करण्यात आला. महानगरपालिकेच्या वतीने हा पुरस्कार अतिरिक्त आयुक्त श्री.सुनील पवार आणि मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त डॉ. अमोल पालवे यांनी स्कॉच डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री.समीर कोच्छर यांच्या हस्ते स्विकारला. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा हा देशपातळीवर दखल घेत झालेला गौरव आहे.

*करभरणा करून शहर विकासात हातभार लावणा-या नागरिकांचे*
*आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले अभिनंदन आणि मानले आभार !*
नवी मुंबई महानगरपालिकेला लाभलेला राष्ट्रीय प्रतिष्ठेचा ‘स्कॉच पुरस्कार’ हा नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी व नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. या माध्यमातून सुशासन, पारदर्शकता, तंत्रज्ञानाधारित करप्रणाली आणि उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन या निकषांवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या उल्लेखनीय कामाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने मालमत्ता कर सुधारणा उपक्रमाचा उल्लेख करावा लागेल, कारण हा प्रकल्प म्हणजे केवळ तांत्रिक बदल नसून नागरिकांचा विश्वास निर्माण करणारा आणि शहराच्या आर्थिक सक्षमीकरणाचा मजबूत पाया आहे. त्यामुळे करभरणा करून शहर विकासात हातभार लावणा-या नागरिकांचे सर्वात मोठे योगदान असल्याबदद्ल आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सर्वांचे अभिनंदन केले असून आभार व्यक्त केले आहेत.
*मालमत्ता कर व्यवस्थेत आमुलाग्र व संरचनात्मक सुधारणा*
नवी मुंबई महानगरपालिकेने पूर्वीच्या हस्तलिखित, त्रुटीपूर्ण व अर्धवार्षिक कर आकारणी प्रणालीऐवजी आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णतः नव्याने सूत्रबध्द व सुनियोजित रचना केलेली मालमत्ता कर प्रणाली अंमलात आणली. या प्रणालीअंतर्गत एकच निश्चित वार्षिक करबिल, शासकीय दरांवर आधारित स्वयंचलित करआकारणी, पारदर्शक व न्याय्य मूल्यांकन, नागरिकांना समजेल अशी सोपी कररचना यांची अंमलबजावणी करण्यात आली.
*नागरिकांचा सहभाग केंद्रस्थानी ठेवून राबवलेली डिजिटल प्रणाली*
मालमत्ता कर प्रणालीतील सुधारणांमध्ये सर्वसमावेशकतेला विशेष प्राधान्य देण्यात आले. नागरिकांसाठी एकाच वेळी ऑफलाईन व ऑनलाईन विविध माध्यमांतून कर भरण्याची सुविधा, क्यूआर कोडद्वारे सुलभ कर भरणा सुविधा देण्यात आली. महानगरपालिकेची www.nmmc.gov.in वेबसाईट, My NMMC ॲप, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड तसेच जीपे, फोनपे, पेटीएम अशा सर्व युपीआय सुविधा आणि व्हॉट्स ॲप चॅटबॉट अशा विविध प्रकारच्या करभरणा सेवा, जनजागृती मोहिमा व माहिती – आधारित थकबाकी वसूली मोहिम राबविण्यात आली. त्यामुळे कर भरण्याबाबत नागरिकांचा विश्वास वाढून स्वयंस्फूर्त सहभाग लक्षणीयरित्या वाढला.
*भौगोलिक नोंदणी व माहिती शुद्धीकरणामुळे अचूकता*
मालमत्तांची अचूक ओळख सुनिश्चित करण्यासाठी मालमत्तांचे भौगोलिक स्थान नोंदविणे, पत्त्यांची पडताळणी व अद्ययावत नोंद, संपर्क क्रमांकांची खात्री, उच्च करक्षमतेच्या मालमत्तांवर लक्ष केंद्रित कारवाई करण्यात आली. यामुळे करआकारणी व संकलनात अचूकता आणि पारदर्शकता वाढली.
*कर संकलनात ऐतिहासिक वाढ*
मालमत्ता कर सुधारणा उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर आर्थिक वर्ष २०२५–२६ मध्ये एकूण ४७८.३५ कोटींचे मालमत्ता कर संकलन नोंदविण्यात आले आहे. यामध्ये १ लाख ५९ हजार ४२५ मालमत्तांकडून कर भरणा, चालू कर संकलन ४२७.२० कोटी, थकबाकी कर संकलन ५१.१५ कोटी, ऑनलाइन कर भरण्यात सुमारे चारपट वाढ, अशी उल्लेखनीय कामगिरी साध्य झाली आहे.
*शहराच्या विकासासाठी स्थिर आर्थिक पाया*
या सुधारणा प्रक्रियेमुळे महानगरपालिकेचा आर्थिक प्रवाह स्थिर झाला असून रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व नागरी सुविधा अधिक प्रभावीपणे राबविणे शक्य झाले आहे. नागरिकांमध्ये प्रशासनाबाबत विश्वास निर्माण होऊन तक्रारी व वादांमध्ये लक्षणीय घट झाली आहे.
मालमत्ता कर भरणा प्रक्रियेत राबविलेल्या विविधांगी व्यापक सुधारणा व नागरिक-केंद्रित डिजिटल प्रशासन उपक्रमांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेस देशातील प्रतिष्ठेचा ‘स्कॉच पुरस्कार २०२५ – सिल्व्हर’ प्रदान करून गौरविण्यात आले असून याव्दारे महानगरपालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.



