नवी मुंबई, 7 जून : पनवेल महानगरपालिकेच्यावतीने गुरूवारी आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा अभियान व पर्यावरणदिनानिमित्त ‘द सायकल सभा’ हा नाविन्यपूर्ण अभिनव उपक्रम आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आला.यावेळी ‘पर्यावरणाच्या दृष्टीने सायकलचे महत्व’ या विषयावर आधारित विशेष चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. तसेच सायकलिंगच्या विविध प्रतिनिधींना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार, पर्यावरण विभाग प्रमुख प्रफुल घरत, महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सायकलचा वापर हा आरोग्यदायी जीवनशैलीसाठी महत्वपूर्ण आहे. याबरोबर पर्यावरणपूरक वाहतुकीचा एक प्रभावी पर्याय आहे, ज्यामुळे प्रदूषणही कमी होते व गर्दी कमी होते. हा संदेश नागरिकांना देण्यासाठी माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत उपायुक्त स्वरूप खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्यावतीने सायकल रॅलींचे आयोजन करण्यात येत असते. या कार्यक्रमात महापालिका कार्यक्षेत्रातील सुमारे दहाहून अधिक सायकलिंगच्या विविध गटांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पर्यावरण संरक्षण, शाश्वत जीवनशैली व हरित वाहतूक यावर माहितीपूर्ण चर्चा यावेळी करण्यात आली. तसेच यावेळी उपस्थित सायकलिंगच्या विविध गटांच्या प्रतिनिधींना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
पर्यावरणाच्या दृष्टीने सायकल चालवल्यामुळे होणारे फायदे
1.संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. हृदय मजबूत होते, रक्ताभिसरण सुधारते, स्नायू ताठर व मजबूत होतात. त्यामुळे फिटनेस राखण्यासाठी सायकलिंग खूप उपयुक्त आहे.
2.मानसिक तणाव कमी होतो. सायकल चालवताना मेंदूला ऑक्सिजन मिळतो, नैसर्गिक वातावरणात मन प्रसन्न राहतं. यामुळे तणाव, चिंता व नैराश्य कमी होण्यास मदत होते.
3.इंधनाची बचत होते. सायकल चालवताना पेट्रोल किंवा डिझेल यांचा उपयोग लागत नाही. त्यामुळे इंधनाची बचत होते आणि परावलंबित्व कमी होते.
4.पर्यावरण रक्षण होते. सायकल चालवल्यामुळे प्रदूषण होत नाही. यामुळे हवामान स्वच्छ राहते आणि कार्बन उत्सर्जन कमी होते. ही एक पर्यावरणपूरक वाहतूक पद्धत आहे.
5.पैशांची बचत होते. इंधन, पार्किंग फी, वाहनाची देखभाल या गोष्टींवरचा खर्च सायकलमुळे वाचतो. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सायकल चालवणे फायदेशीर आहे.



