नवी मुंबई, 6 जून : ‘जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मूलन’ या संकल्पनेनुसार यावर्षीचा जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शासन आदेशानुसार नागरिकांमध्ये जनजागृती, स्वच्छता मोहीमा, पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगिकार तसेच कार्यशाळा आयोजन अशा विविध विषयांवर उपक्रम आयोजित करण्यात आले.
या अंतर्गत जागतिक पर्यावरण दिनी संध्याकाळी करावे येथील डोलाया खाडी किनारी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली व उपस्थितीत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये विशेषत्वाने प्लास्टिक कचरा गोळा करण्यावर भर देण्यात येऊन 160 गोणी प्लास्टिक बॉटल्स, पिशव्या, रॅपर्स आणि तत्सम कचरा गोळा करण्यात आला. या स्वच्छता मोहीमेच्या आयोजनात हेंकेल (Henkel) कंपनीने पुढाकार घेतला असून त्यासोबत नेक्सस मॉल सीवूड, माता अमृतानंदमयी मठ तसेच एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी महापालिका अधिकारी, कर्मचारी व स्वच्छतामित्रांसह सक्रिय सहभाग घेतला.
या मोहीमेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, परिमंडळ 1 उपआयुक्त सोमनाथ पोटरे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे, बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.अमोल पालवे, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे, स्वच्छता अधिकारी नरेश अंधेर साहेब तसेच हेंकेल कंपनीचे साऊथ एशिया रिजन इन्फ्रास्ट्रक्चर हेड भूपेश सिंग, सूर्योदय बँकचे पणन वरिष्ठ व्यवस्थापक प्रसाद साखरकर आणि सर्वच संस्थांचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. याप्रसंगी उपस्थितांनी माझी वसुंधरा अभियानाची सामुहिक शपथ ग्रहण केली.



